आपले स्वतःचे हक्काचे एक सुंदर घर असावे हे प्रत्येक मानवाचे एक स्वप्न असते... परंतु आजच्या काळात वाढलेल्या घराच्या किमती , ते घर परिपूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधांचा खर्च , ते स्वप्नातले घर आणखी सजवण्यासाठी लागणार पैसा या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर एकंदरीत असे लक्षात येते कि मध्यमर्गीयांसाठी घर घेणे म्हणजे काही आता येड्या गबाळ्याचे काम नव्हे. स्वतःच्या बचतीतून घर म्हणजे केवळ दिव्यस्वप्न .
त्यामुळे घर घेतांना - कर्ज घेणे हे अनिवार्य झाले आहे. मग ही पैश्यांची जमवाजमव कधी - बँक कडून ( सरकारी किंवा प्रायव्हेट ) , गृहकर्ज वित्तसंस्था , नातेवाईक किंवा मग घरातील दागदागिने विकून , एखादी पडिलोपार्जीत मालमत्ता किंवा स्वतःचे राहते जुने घर विकून सुद्धा केली जाते.
मुळातच आयुष्यभराची जमा पुंजी आणि उरावर असलेलं प्रचंड कर्जाचा डोंगर, घेतलेल्या घरात अटकणार असल्याने केवळ योग्य घर घेणेच महत्त्वाचे नसते, तर सर्वोत्तम गृहकर्ज निवडणेही तितकेच महत्त्वाचे असते.आपल्यापैकी अनेकांसाठी गृहकर्ज ही सर्वात मोठी आर्थिक बांधीलकी असल्याने याबाबतीत पद्धतशीर दृष्टिकोन अतिआवश्यक आहे.
जागांच्या वाढत्या किमती पाहता मध्यमर्गीयांसाठी गृहकर्जास काहीच पर्याय नाही. गृहकर्ज हे दीर्घ कालावधीचे आणि घर तारण असल्याने, कर्ज देणाऱ्या बॅंक्स, गृह कर्ज संस्था साठी सर्वात सुरक्षित कर्ज असे समजण्यात येते. त्यामुळेच वित्तीय संस्था त्यास प्राधान्य देतात. त्यामुळे वित्तीयसंस्थेकडे पुढील कित्येक वर्षे सातत्याने आणि नियमितपणे पैसे येत राहतात.त्यामुळेच या क्षेत्रात भरपूर बँक आणि वित्तीय संस्था उतरल्याचे दिसून येते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे लोक भरपूर जाहिराती करतात आणि कर्जदाराला वेगवेगळे आमिष दाखवून भुलवयाचा प्रयत्न करतात.
गृहकर्ज घेण्यापूर्वी ते कोणाकडून घ्यावं, कोणत्या बँकेकडून किंवा वित्तसंस्थेकडून घ्यावं याबाबत सर्वंकष विचार केला पाहिजे. मनामध्ये याबाबत काही संभ्रम असेल तर एखाद्या तज्ज्ञाकडून त्याबद्दलची माहिती घ्यावी. आपण घर घेताना जेवढा विचार करतो गृहकर्ज घेताना तेवढा विचार करत नाही. घर शोधण्यात बराच वेळ घालवतो आणि एकदा घर सापडल्यानंतर गृहकर्ज अतिशय झटपट घेऊन टाकतो.गृहकर्ज घेणं अलीकडच्या काळात सोपं वाटत असलं तरी गृहकर्जाची निवड करताना कुठल्याही बँकेची अथवा वित्तीय संस्थेची निवड घाईगडबडीने करू नये. गृहकर्जासाठी फायदेशीर ठरणारे निकष तपासून घ्यावेत. केवळ पटकन कर्ज देणारी संस्था म्हणून कुठल्याही बँकेची अथवा वित्तीय संस्थेची निवड करू नये. म्हणजे परतफेड करताना अधिक रकमेचा परतावा करावा लागणार नाही.
गृहकर्ज घेतांना साधारणतः कोणते निकषांचा विचार करावा ते बघूया -
१) सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे - घराच्या एकूण किमतीच्या किती टक्के कर्ज बँक किंवा वित्तीय संस्था देईल हे बघणे:-
घराच्या एकूण किमतीच्या किती टक्के कर्ज बँक किंवा वित्तीय संस्था देईल ( थोडक्यात margin ) बघणे अतीशय आवश्यक आहे. घराच्या किमतीच्या साधारणतः ८०-८५ टक्के पर्यंत कर्ज मिळू शकते. ( काही बँका ९०-९५% टक्के कर्ज सुद्धा देतात) काही बँका आणि वित्तीय संस्था घर खरेदीला लागणारी स्टॅम्प ड्युटी , one time maintenance इत्यादी साठी सुद्धा कर्ज देतात .
२) कर्ज परतफेडीची मुदत :-
मुदतफेडीची र्वष जेवढी जास्त तेवढा फेडीचा मासिक हप्ता छोटा असतो. म्हणून बहुतेक जण दीर्घ मुदत पसंत करतात. पण जेवढा कालावधी जास्त तेवढे बँकेला भरावयास लागणारे एकूण व्याजही जास्त बसते. कारण जादा मुदतीसाठी जादा व्याज दर हे सूत्र बहुतेक ठिकाणी दिसून येतं. म्हणूनच आपले उत्पन्न पाहून कमी मुदत निवडणं फायद्याचं ठरतं.
३) व्याज दर स्थिर (Fixed interest rate) घ्यायचा की बदलता (Floating Interest Rate) घ्यायचा :-
भविष्यात व्याजदर जर चढणार असेल तर कर्जदार स्थिर व्याजदर घेतात. पण, उतरत्या व्याजदराचा अंदाज असेल तर बदलत्या दरास म्हणजे ‘फ्लोटिंग’ दरास पसंती दिली जाते. जी बँक compititive व्याज दर देते तिचा विचार करायला पार्कात नाही.
४) प्रधानमंत्री आवास योजना :-
ठराविक अटींची पूर्तता केल्यास , सरकार कडून आपणास " प्रधानमंत्री आवास योजने" अंतर्गत २,६७,००० रुपये पर्यंत चा रीबेट मिळतो. या अटींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने घराची नोंदणी करावी आणि गृहकर्ज देणाऱ्या संस्थेला तो रीबेट मिळवण्यासाठी करावी लागणारी procedure ची माहिती घ्यावी.
४) प्रोसेसिंग फीस :-
कुठल्याही बँकेकडून कर्ज घेण्यापूर्वी प्रोसेसिंग फीस भरावी लागते . शिवाय कर्ज नामंजूर झाल्यावरही हे शुल्क परत मिळत नाही. काही बँका निम्मे शुल्क परत करतात तर काही बँका ठरावीक काळासाठी नवे ग्राहक मिळण्याच्या हेतूने हे शुल्क माफ करतात. त्यामुळे कर्ज घेतांना कोणती बँक किती प्रोसेसिंग फीस लावते किंवा सवलत देते ते तपासावे.
५) विमा खर्च :-
गृहकर्ज घेताना बँकेकडे घर तारण राहतं. या तारणाचा विमा उतरवणं काही बँक सक्तीचे करतात. अश्यावेळी एखादी बँक विम्याचा खर्च स्वत:सोसण्याची तयारी दाखवते, तर एखादी बँका विम्याचीही कर्ज रकमेच्या सोय उपलब्ध करून देते आणि त्याचा सुद्धा वेगळा हफ्ता बांधून देते .
त्यामुळे कमी विमा आकारणारी किंवा सूट देणारी बँक कोणती हे तपासावे.
६) छुपे खर्च ( hidden charges ) :-
काही वेळा बँक आणि वित्तीय संस्था, वेळोवेळी, ठरलेल्या व्याजदाराव्यतिरिक्त अनेक छुपे खर्च कर्ज रकमेत नावे टाकत जाते. त्यामुळे नकळत कर्जरक्कम वाढत जाते. म्हणून कर्ज घेण्याअगोदर अशाप्रकारच्या खर्चाची माहिती घ्यावी.
७) मुदतपूर्व परतफेड :
गृहकर्ज परतफेडीमध्ये आणखी एक मुद्दा महत्त्वाचा असतो आणि तो म्हणजे मुदतीअगोदर भरलेली परतफेड रक्कम. ग्राहकाने ठरलेल्या मुदतीअगोदरच जास्त रक्कम भरून खातं बंद केलं तर कर्जदेणार्या बँकांचं व्याज बुडतं. म्हणूनच अश्या बँका जास्त रक्कम मुदतपूर्व भरण्यास उत्तेजन देत नाहीत. अनेक वेळा तर मोठा दंडदेखील आकारतात तर काही बँका कर्जदार स्वत:च्या उत्पन्नातून जास्त रक्कम भरत असेल तर दंड आकारत नाहीत. पण, कमी व्याज दर असणाऱ्या बँकेकडून कर्ज घेऊन परतफेड होत असेल तर मग मात्र दंड आकारला जातो.
असे अनेक मुद्दे आपण अतिशय बारकाईने तपासून वेगवेगळ्या बँकांच्या योजनांचा अभ्यास करूनच गृहकर्ज घेण्याचा निर्णय घ्यावा.
Comentários